CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय अभियानांतर्गत जुहू चौपाटी स्वच्छता मोहीम हाती घेतली. जुहू चौपाटीवर मुख्यमंत्र्यांनी साफसफाई देखील केली. यावेळी राज्यातील नागरिकांना देखील स्वच्छतेचा संदेश दिला. समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन देखील उपस्थित होते.
सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिन आहे. याच्यामुळे आज जुहू चौपाटीवर सगळेजण जमले आहेत. आमचे राज्यपाल आले आहेत, आमचे केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादवजी आले आहेत आणि सगळी इथली आमच्यासोबत सामील झाले आहेत. आज बघा पूर्ण जुहू समुद्र एकदम स्वच्छ आहे. राज्याला 720 किलोमीटर लांबीमध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे आणि याचा परिणाम पूर्ण देशभरात आहे. सगळे आपली घरी जशी स्वच्छ ठेवतात तसेच आपला आजूबाजूचा परिसर, शहर सर्वकाही स्वच्छ ठेवले पाहिजे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, शासनाच्या सर्व यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून हे शहर आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निमित्ताने केले.