"...तर कुस्ती होणारच", कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचं मोठं विधान
महायुतीकडून छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात रणधुमाळी सुरु झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच छत्रपती शाहू महाराजांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरमधून महायुतीच्या उमेदवारीची घोषणा झाली नाहीय, पण समरजीतसिंह घाटगे किंवा धनंजय महाडीक यांचं नाव आघाडीवर आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, दोघेही माझे मित्र आहेत. लोकशाही म्हटलं, तर कुस्ती होणारच. लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया नैसर्गिक आहे. या नैसर्गिक प्रक्रियेत एकपेक्षा दोन उमेदवार असतातच. एकच उमेदवार असेल, अशी क्वचितच परिस्थिती असते. परंतु, पुढे जाण्याची आपल्या सर्वांची तयारी पाहिजे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते की, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती. निवडणूक लढवायची हे सुरुवातीपासूनच वाटलं होतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, आधीपासूनच वातावरणनिर्मीती होती. मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, याची त्यांना आधीपासूनच खात्री झाली होती. ही निवडणूक नसून एकप्रकारचं विचारमंच आहे, असं मी समजतो. राजकारणाची उलथापालथ तुम्ही पाहिली आहे, पण आता प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याची वेळ आली, असं काय घडतंय कोल्हापूरमध्ये? या प्रश्नाचं उत्तर देताना शाहू महाराज म्हणाले, जनतेचाच असा विचार होता. जनतेला जास्तीत जास्त अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळत नव्हती. त्यांना कोणताही मार्ग सुचत नव्हता. या वातावरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार केला की, मी सुद्धा यामध्ये भाग घ्यावा.
प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे, यावर बोलताना ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांची आणि माझी चांगली ओळख आहे. अनेक कार्यक्रमात ते मला भेटले आहेत. त्यांनी जर मला पाठिंबा दिला असेल, तर मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. वंचितचा मविआसोबतचा जागावाटपाचा तिढा सुटत नाहीय, प्रकाश आंबेडकरांनी काय करावं? या प्रश्नाचं उत्तर देताना शाहू महाराज म्हणाले, त्यांच्यासोबत माझा प्रत्यक्ष संवाद झाला नाहीय. महाविकास आघाडीचा काय विचार आहे, याबाबत मी कोल्हापूरमधून सांगू शकत नाही. मविआ इंडिया आघाडीसोबत आहे. इंडिया आघाडीत असल्याने सर्वांनी एकत्र काम करायचं आहे, हे निश्चित आहे. सर्व ठिकाणी जनतेवर दबाव आहे. महागाईचे प्रश्न मोठे आहेत. असे अनेक प्रश्न जनतेसमोर आहेत. हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जात नाहीत. नाकापर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत आपण हातपाय हालवत नाही. भारताची जनता सहन करणारी आहे.
कोल्हापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे, मग यावेळची लढाई सोपी वाटते का? शाहू महाराज म्हणाले, लढाई कधीच सोपी नसते. लढाई लढाईच असते. लढाईची सर्वांनी आपापल्या परीनं तयारी करायची असते. त्याप्रमाणे जनता, पक्ष, उमेदवार तयारी करतात. तुम्हीही तयारी केली आहे, तुमच्या प्रचाराचा अजेंडा काय असेल? शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. उद्योगाचे, रोजगारीचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न भविष्यात सोडवायचे आहेत. कुणीही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देऊ नये, निवडणूक बिनविरोध करावी, अशी चर्चा होती. तुमची यावर प्रतिक्रिया काय? शाहू महाराज म्हणाले, अशी चर्चा कोणामध्ये झाली, हे मला माहिती नाही. लोकशाहीत ही प्रक्रिया होणे गरजेचे आहे.