IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव
आयपीएल २०२४ चा ६१ वा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ५ विकेट्स गमावत १४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने १८.२ षटकात ५ गडी राखून १४५ धावा केल्या आणि राजस्थानचा पराभव केला. या विजयामुळे चेन्नईच्या संघाच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राजस्थानचा सलग तिसरा पराभव झाला असून चेन्नईचा प्ले ऑफचा मार्ग सुकर झाला आहे.
चेन्नईसाठी सलामीला उतरलेल्या रचिन रविंद्रने २७ धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद ४२ धावांची खेळी करून चेन्नईला विजय मिळवून दिला. डॅरेल मिचेल (२२), मोईन अली (१०), शिवम दुबे (१८), रविंद्र जडेजा (५), तर समीर रीझवीने नाबाद १५ धावा केल्या. चेन्नईसाठी तुषार देशपांडेनं २, तर सिमरजीत सिंगने ३ विकेट्स घेतल्या.
राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर यशस्वी जैस्वाल (२४), जॉस बटलर (२१), संजू सॅमसन (१५), रियान पराग नाबाद ४७ धावा, ध्रुव जुरेलने २८ धावा केल्या. राजस्थानसाठी रविचंद्रन आश्विनने २ विकेट घेतल्या. तर नांद्रे बर्गर आणि युजवेंद्र चहलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.