23 ऑगस्टला उतरू शकले नाही तर पुढे काय होणार? इस्रोच्या शास्त्रज्ञाने सांगितले
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष चांद्रयान-3 कडे लागले आहे. चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5.47 वाजता चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे इस्त्रोने सांगितले आहे. परंतु, लँडिंगमध्ये अडचण आल्यास चांद्रयान 23 ऑगस्टऐवजी 27 ऑगस्टला चंद्रावर उतरेल, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञाने सांगितले आहे.
माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी आम्ही लँडर मॉड्यूलची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेऊ. त्यावेळी चंद्रावरील परिस्थिती योग्य आहे की नाही. वातावरण तपासले जाईल. जर कोणताही घटक अनुकूल वाटत नसेल, तर आम्ही 27 ऑगस्ट रोजी मॉड्यूल चंद्रावर उतरवू. तथापि, कोणतीही अडचण येऊ नये आणि 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर मॉड्यूल उतरविण्यात सक्षम होऊ, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी सांगितले आहे.
चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करावे लागेल तिथे आजपर्यंत कोणीही पोहोचले नाही. इस्रोने यापूर्वी 2019 मध्येही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यानंतर चंद्रयान-2 चा लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना क्रॅश झाला होता. तर, भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसोबतच रशियाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगसाठी आपले लुना-25 पाठवले आहे. तथापि, अनियंत्रित कक्षेत गेल्यानंतर, लुना-25 शनिवारी चंद्रावर कोसळले.
दरम्यान, इस्रोने 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 लाँच केले. चांद्रयान-3 मिशनच्या लँडर मॉड्यूलचा चंद्रावर 23 ऑगस्ट रोजी उतरणार असून हे लाईव्ह पाहता येणार आहे. इस्त्रोची वेबसाइट, त्याचे युट्युब चॅनल, इस्त्रोचे फेसबुक पेज आणि डीडी (दूरदर्शन) राष्ट्रीय टीव्ही चॅनेलसह अनेक प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल.