रिपब्लिकन पार्टी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांता सोनकांबळे यांची निवड
चंद्रशेखर भांगे | पुणे: तब्बल पाच वेळा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये निवडून येवून सर्वसामान्य जनतेचा आवाज सभागृहात मांडणाऱ्या तसेच पक्षाच्या विविध प्रमुख जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या चंद्रकांता सोनकांबळे यांची रिपब्लिकन पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .त्यांच्या निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच केली आहे .त्यांच्या निवडीने संपूर्ण राज्यभर महिलांची मोठी शक्ती उभी रहाणार असल्याचे दिसते आहे.
सोनकांबळे यांनी याअगोदर महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस यासारख्या पार्टीच्या पदावर काम पाहिले आहे .पिंपरी विधानसभा मतदारसंघात२०१४ ला सोनकांबळे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नावाने ४८००० विक्रमी मतदान घेतले होते. त्यांचे वडील दिवंगत एल.एस.सोनकांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते माजी खासदार ऍड बी.सी. कांबळे साहेब यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले तसेच 1992 मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून हे निवडून आले होते. चंद्रकांता सोनकांबळे यांच्या निवडीने पुण्याला आणि पिंपरी चिंचवड शहराला अतिशय महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील महिलांवरील अन्याय अत्याचार तसेच महिलांच्या विविध प्रश्नासाठी मोठा लढा उभारून माननीय रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाने महिलांना न्याय देणार तसेच महीला सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे चंद्रकांता सोनकांबळे यांनी सांगितले आहे.