Agneepath Scheme: विरोधानंतर केंद्राचा मोठा निर्णय, CAPF-असम राइफल्समध्ये 10 टक्के आरक्षण
Reservation for Agniveer: अग्निपथ योजनेबाबत रस्त्यावर उतरलेल्या संघर्षादरम्यान गृह मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण दिले जाईल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
लष्करी भरतीसाठी केंद्रातील मोदी सरकारनं आणलेल्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलनाचा भडका देशभर उडाला आहे. उत्तर भारतात सुरू झालेल्या या आंदोलनाचं लोण तीन दिवसांत दक्षिण भारतातही पसरलं. सार्वजनिक मालमत्तेचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. हा भडका शांत करण्यासाठी केंद्र सरकारनं वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही आंदोलन थांबत नसल्याने आता 'अग्निपथ' योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दल व आसाम रायफल्समध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
गृह मंत्रालयाने अग्निवीर म्हणून सेवा पूर्ण केलेल्यांसाठी वयोमर्यादेतही सवलत जाहीर केली आहे. अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिली जाईल. अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट दिली जाईल.
अमित शाहांची घोषणा
आसाम रायफल्स आणि CAPF च्या भरतीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली होती. अग्निपथ योजना गृह मंत्रालयाने प्रशिक्षित तरुणांना देशाची सेवा आणि सुरक्षेमध्ये आणखी योगदान देण्याचा एक मार्ग म्हणून सांगितले होते. गृह मंत्रालयानेही आता अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. गृह मंत्रालयाने घोषणा अशावेळी केली आहे, जेव्हा देशभरात या योजनेविरोधात निदर्शने होत आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची चार वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी २५ टक्के अग्निवीरांची लष्कराच्या कायमस्वरूपी केडरमध्ये भरती करण्यात येणार आहे.