राजधानी दिल्ली पुन्हा हादरली! दिल्ली-NCR सह 'या' भागात भूकंपाचे धक्के
देशाची राजधानी दिल्लीसह एनसीआरच्या अनेक भागात सोमवारी (22 जानेवारी) भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री झालेल्या भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं तसेच अनेक लोक रस्त्यावर देखील आल्याचे पाहायला मिळाले. राजधानी दिल्ली सोमवारी रात्री 11:39 च्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. हे धक्के बराच वेळ बसत होते.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हा किर्गिस्तान आणि चीन सीमेवर असल्याचे सांगितले जाते. चीनच्या शिनजियांगच्या दक्षिणेकडील भागात 7.2 रिश्टर स्केलची तीव्रता नोंदवलेल्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर पडले. पंजाबपासून हरियाणा, हिमाचलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. शेजारील पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा चीनच्या दक्षिण शिनजियांगमध्ये होता. तर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजली गेली. रात्री 11.39 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 80 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की दिल्ली-एनसीआरमध्येही त्याचा प्रभाव जाणवला. बराच वेळ पृथ्वी थरथरत राहिली. भीतीपोटी लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आले.
दरम्यान, यापूर्वी 11 जानेवारी रोजी अफगाणिस्तानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा देखील दिल्ली आणि एनसीआरमध्ये सौम्य धक्के जाणवले होते. त्यानंतर काही दिवसांतच ही ही घटना घडली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलच्या ईशान्येला 241 किलोमीटर अंतरावर आहे.