Brij Bhushan Singh : 'राज ठाकरे कधी भेटले तर माझा हिसका दाखवेन'
लखनऊ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा भाजपा खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्यामुळेच रद्द झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरुन राज ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. परंतु, मनसेला अडकवण्यासाठी अयोध्येत सापळा रचण्यात आल्यानेच आपण अयोध्या दौरा रद्द केल्याचे राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत सांगितले. परंतु, यानंतरही बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे. राज ठाकरे कधी मला भेटले तर मी त्यांना नक्कीच माझा हिसका दाखवेन, असे वक्तव्य बृजभूषण सिंह यांनी केले आहे.
बृजभूषण सिंह म्हणाले की, मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधत आहे. ते जेव्हाही मला भेटतील मी नक्कीच त्यांना माझा हिसका दाखवेन. त्यांना चांगलाच धडा शिकवेन, असेही त्यांनी म्हंटले आहे. राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवून देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतला आहे.
राज ठाकरे यांनी राम जन्मभूमीचं दर्शन मला घ्यायचे होते, त्यासोबतच कारसेवकांचे मृत्यू ज्याठिकाणी झाले होते, तेथे देखील भेट द्यायची होती, अशी इच्छा पुण्यातील सभेत बोलून दाखवली होती. यावर बृजभूषण सिंह म्हणाले की, राज ठाकरे यांचे हदय परिवर्तन झाले आहे. त्यांना अयोध्येला यायचे आहे. परंतु, आम्ही सर्वच रामाचे वंशज आहोत. आणि राज ठाकरेंनी त्यांचाच अपमान केला आहे. राज ठाकरे यांनी माफी मागितली तरच ते अयोध्येला येऊ शकतात. ते जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत त्यांना अयोध्येतच काय उत्तर प्रदेशच्या कोणत्याही भागात पाऊल ठेवू देणार नाही.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी पायाच्या त्रासासंदर्भात हीप बोनवर शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच, मनसे कार्यकर्त्ंयांना अयोध्येत केसेसमध्ये अडकविण्याचा सापळा रचण्यात आला होता. ज्यांना माझी अयोध्या वारी खुपत होती, त्यांनी हा डाव आखल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे सांगितले होते.