rain
rain

Mahrashtra Rain Upadte: सीएसएमटी ते वडाळा वाहतूक दोन तास बंद

राज्यात सध्या पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. कोकण, कोल्हापुरात नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशात मुंबईसह प्रत्येक जिल्ह्याचे संपूर्ण अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

सीएसटी ते वडाळा दोन तास ब्लॉक

सकाळच्या सुमारास मशीद रोड स्थानकादरम्यान रुळाजवळ संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. त्याचा ढिगारा त्वरित हटविण्यात आला आहे. मात्र, याचा फटका हार्बर रेल्वेला बसला. यामुळे सीएसटी ते वडाळा मार्गावर दोन तास ब्लॉक घेण्यात आला आहे. तर, ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. प्रवाशांना दादर आणि कुर्ला मार्गे मेनलाइनवर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता

शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार वारे 40-50 किमी प्रतितास ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

मुंबईत 24 तासांत 110 मिमी पाऊस

मुंबईत 24 तासांत 110 मिमी पाऊस पडला आहे. आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत उपनगरांत 125 मिमी पाऊस झाला आहे. 1 जूनपासून मुंबईत 1,083 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मुंबईत आतापर्यंत वार्षिक गरजेच्या 49.11% पाऊस झाला असल्याचे समजते आहे. यामुळे मुंबईत पाऊस सध्या जूनची कसरच भरुन काढतोय की काय असा प्रश्न सामन्यांना पडला आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून नॉन-स्टॉप पाऊस पडत आहेत. यामुळे मध्ये रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून लोकल २० ते २५ मिनिटं उशीरानं धावत आहे.

पुण्यातील कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळली

पुण्यातील कात्रज जुन्या बोगद्याकडे जाताना (अलिकडे अंदाजे १०० मी अंतरावर) रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. याची माहिती अग्निशमन दलाकडे एका पीएमपीएमएल ड्रायव्हरने दिली असून तिथे त्याने रस्त्यावर मोठे दगड आल्याने खबरदारी म्हणून झाडाची मोठी फांदी ठेवली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूरासह 'या' चार जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७, ८ व ९ जुलै रोजी रेड अलर्ट तर १० जुलैसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर, सातारा जिल्ह्यासाठी ६, ७, ८ रोजी रेड अलर्ट तर ९ व १० जुलैसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. व चंद्रपूर, नाशिक, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com