विराट कोहलीच्या टी-२० विश्वचषकाच्या स्थानाबाबत दिग्गज ब्रायन लाराचं मोठं विधान, म्हणाला, "सलामी फलंदाज..."
आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला स्टार खेळाडू विराट कोहलीवर धीम्या स्ट्राईक रेटमुळे टीकेचा सामना करावा लागत आहे. विराटने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरोधात झालेल्या सामन्यात ६७ चेंडूत शकत ठोकलं. याआधी २००९ मध्ये अशाच धीम्या स्ट्राईक रेटने मनीष पांडेनं शतकी खेळी केली होती. अशातच वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने आगामी टी-२० विश्वचषकातील विराट कोहलीच्या स्थानाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला ब्रायन लारा?
स्ट्राईक रेट फलंदाजीच्या क्रमांकावर अवलंबून असतं. सलामी फलंदाजासाठी १३०-१४० चा स्ट्राईक रेट चांगला आहे. पण तुम्ही मध्यक्रममध्ये फलंदाजी करत असाल, तर तुम्हाला १५०-१६० च्या स्ट्राईक रेटने धावा करण्याची आवश्यकता असते. आयपीएलमध्ये शेवटच्या षटकांत फलंदाज २०० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटतात, हे तुम्ही पाहिलंच आहे. कोहलीसारखा सलामी फलंदाज सामान्यत: १३० च्या स्ट्राईक रेटने इनिंगची सुरुवात करतो. त्यानंतर त्याच्याकडे १६० च्या स्ट्राईक रेटने इनिंग संपवण्याची संधी असते.
टी-२० विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्माच्या माध्यमातून इनिंगची सुरुवात करणं एक चांगला विकल्प होऊ शकतो. मला वाटतंय की, रोहित आणि विराट वेस्टइंडिजमध्ये सलामी फलंदाज म्हणून विश्वचषकात खेळणं भारतासाठी खूप चांगलं होईल. परंतु, इनिंगच्या सुरुवातील युवा खेळाडूही असले पाहिजेत, असं मला वाटतं. या अनुभवी खेळाडूंपैकी एकाने मध्यक्रमात इनिंग सावरण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हे अनुभवी खेळाडू लवकर बाद झाल्यावर संघावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून मी विराट आणि रोहित यांच्यापैकी एक खेळाडू सलामीला आणि दुसऱ्याला तिसऱ्या नंबरवर खेळवेल.