ग्रामपंचायत निवडणुकीवर चिपळूण तालुक्यातील गाणे ग्रामस्थांचा बहिष्कार

ग्रामपंचायत निवडणुकीवर चिपळूण तालुक्यातील गाणे ग्रामस्थांचा बहिष्कार

चिपळूण तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीत पंचवार्षिक निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निसार शेख, रत्नागिरी

चिपळूण तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीत पंचवार्षिक निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये 12गावे बिनविरोध झाली. गतवर्षी जिल्ह्यात चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेली कामथे ग्रामपंचायत देखील यावेळी बिनविरोध झाली. मात्र बिनविरोधची परंपरा बाळगणाऱ्या गाणे ग्रामस्थांनी मात्र थेट ग्रामपंचायत निवडणुकीवरच बहिष्कार टाकल्याचे चित्र आहे. गाणे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केलेले प्रयत्न देखील निष्फळ ठरले आहेत.तालु्यात सध्या असुर्डे, आंबतखोल, आबिटगाव, उमरोली, ओमळी, उमरोली, करंबवणे, कळकवणे, कापरे, कामथे, कामथे खुर्द, केतकी, खांडोत्री, खांदाटपाली, गाणे, गुडे, गुळवणे, गोंधळे, डुगवे, ढाकमोली, देवखेरकी, धामेलीकोंड, नविन कोळकेवाडी, नारदखेरकी, परशुराम, पेढे, बामणोली, बिवली, भिले, मालदोली, वहाळ, शिरगांव, शिरवली या ३२ गावांत निवडणूका जाहीर झाल्या. यामध्ये गाणे गावातून निवडणूकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

गाणे गावाने गेली ३५ वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपली आहे. गेली पाच वर्षे निवृत्ती केशव गजमल या तरूण सरपंचाने यशस्वी कामगिरी केली. माजी सरपंच गजमल हे यावेळच्या निवडणूकीस देखील इच्छूक होते. गाव बैठकीत उमेदवारीबाबत बैठक होत असताना निवृत्ती गजमल यांनी निवडणूकीसाठी इच्छूक उमेदवार असल्याचे सांगितले होते. त्यांनी गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत गावात सहा ते सात कोटींची विकास कामे केली. सर्वाना सोबत घेऊन त्यांनी विकास कामांवर भर दिला. मात्र बैठकीदरम्यान त्यांनाच काही ग्रामस्थांनी उमेदवारीसाठी विरोध केला. मात्र बहुतांशी लोकांनी पाठींबा दिल्याची माहिती उपलब्ध होत आहे. एका जागेसाठी निवडणूक होऊदे अशीही चर्चा झाली.

मात्र तीही फोल ठरली. सरतेशवटी कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. शेवटी एक वाडी दुसऱ्या प्रभागात जोडली गेल्याचा मुद्दा उपस्थित झाला. प्रभागरचेनेवेळी कोणीच त्यावर आक्षेप न घेतल्याने आता काहीच करता येत नसल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी गाणे ग्रामस्थांची भेट घेत चर्चा केली. तरिही एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीवर गाणे ग्रामस्थांचा बहिष्कार असल्याचे दिसून येत आहे. परिणामी पुढील काही महिने या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट लागू राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com