Rakesh Tikait यांच्यावर संघटना नाराज; भारतीय किसान युनियनचे झाले दोन गट
भारतीय किसान युनियनमध्ये (BKU) फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी स्थापन केलेली युनियनचं नेतृत्व त्यांचे पुत्र नरेश टिकैत आणि राकेश टिकैत (Rakesh Tikait) करत होते. दोघेही आता वेगळे होताना दिसत आहे. बीकेयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश सिंग चौहान यांनी त्यांच्या समर्थकांसह बीकेयू (अराजकीय) ही स्वतंत्र संघटना स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त लखनऊमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मतभेद झाल्यानंतर बीकेवाययूचे दोन भाग झाले. नव्या संघटनेचे प्रमुख राजेश चौहान यांनी टिकैत बंधूंवर आरोप केला आहे की, शेतकरी आंदोलनानंतर संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून दूर गेली आणि राजकीय मुद्द्यांकडे वाटचाल करू लागली. यामुळे संस्थेचं नुकसान होतंय. त्यामुळेच त्यांनी बीकेयू व्यतिरिक्त स्वतःची संघटना स्थापन केली आहे, जी केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणार आहे.
दरम्यान, भारतीय किसान युनियन अराजकीयचे अध्यक्ष राजेश चौहान यांनी रविवारी लखनऊच्या शुगरकेन इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. नव्या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंगेराम त्यागी, राष्ट्रीय प्रवक्ते धर्मेंद्र मलिक, युवा प्रदेशाध्यक्ष चौधरी दिगंबर आणि प्रदेशाध्यक्ष हरिनाम सिंह वर्मा हे असणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष राजेश चौहान आणि प्रदेशाध्यक्ष हरिनाम सिंह वर्मा म्हणाले की, भारतीय किसान युनियन शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून दूर गेली असून आता राजकारण करू लागली आहे. त्यामुळे अराजकीय भारतीय किसान युनियनची गरज निर्माण झाली आहे. ही संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करेल. राजेश चौहान हे बीकेयूमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. याशिवाय कार्यकारिणीतील सर्व सदस्य मूळ भारतीय किसान युनियनमध्ये वेगवेगळ्या पदावर होते.