"तुझं नाव मोहम्मद आहे का?" म्हणत वृद्धाला मारहाण; जैन व्यक्तीचा मृत्यू
मध्य प्रदेशातील नीमच एका वृद्धाला अमानुष मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, एक व्यक्ती वृद्ध व्यक्तीला अमानुष पद्धतीनं मारहाण करतोय. यावेळी मारहाण करणारी व्यक्ती वृद्धाला आधारकार्ड दाखवालया देखील सांगतोय. ही घटना नीमच जिल्ह्यातील मनसा येथे घडल्याचं समजतंय. या घटनेतील वृद्ध व्यक्ती ही रतलाम जिल्ह्यातील सरसी येथील रहिवासी भंवरलाल चत्तर जैन हे असून, त्यांचं वय 65 असल्याचं समजतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या एक दिवस आधी या वृद्धाचा फोटो मनसा पोलिसांनी प्रसिद्ध केला होता. यानंतर रामपुरा रोड मारुती शोरूमजवळ या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती ही भंवरलाल जैन असल्याचं समजलं आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मयताचा भाऊ आणि गावातील लोकांनी मनसा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आरोपीला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. एनडीटीव्हीने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी वृद्धाला सलग कानशिलात भडकावताना दिसत आहेत. यावेळी मारहाण करताना तो व्यक्ती वृद्धाला तुझं नाव 'मोहम्मद' आहे का, असं विचारतोय. यावेळी वृद्ध व्यक्ती घाबरतोय आणि त्याला सोडण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र आरोपीला दया येत नाही, तो सतत मारहाण करतोय.