"अमरावतीची जागा मी लढणारच...मला दिल्लीवारी करायची गरज नाही", बच्चू कडूंचा महायुतीवर 'प्रहार'
भारतीय जनता पक्षाने अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी महायुतीवर तोफ डागण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधनाता कडू म्हणाले, ब्रम्हदेव खाली आले तरी, अमरावतीची जागा मी लढणारच. मला दिल्लीवारी करायची गरज नाही. महायुतीतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही महायुतीची असेल तर आम्ही आनंदाने त्यांचा निर्णय स्वीकारू.
माध्यमांशी बोलताना कडू म्हणाले, काल आमची नांदेडला एक बैठक झाली. लोकसभेबाबत आपण काय केले पाहिजे आणि कशा पद्धतीने समोरं गेलं पाहिजे, यासाठी ही बैठकआहे. प्रत्येक जिल्ह्यामधील काही कार्यकर्ते सांगतात की, आम्हाला भरपूर त्रास झाला आहे. जालन्याच्या खासदारांना प्रचंड त्रास दिला आहे. निलेश लंके चांगले आहेत, असे काही काही कार्यकर्ते आम्हाला सांगत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्हाला एक अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.
त्यासाठी ही प्राथमिक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. चार जिल्ह्यांची ही बैठक होती. अमरावती लोकसभेवर बोलताना कडू म्हणाले, मला असं वाटतं की, आता अमरावतीचं काहीही राहिलेलं नाही. फक्त निकाल बाकी आहे आणि तो प्रहारचाच आहे. महायुतीवर बोलताना कडू म्हणाले, आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं, तो निर्णय सध्या महायुतीकडे आहे. ते जो निर्णय घेतील, त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करू.
मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील आणि माझा संबंध नाहीय. त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्यासोबत गेलो होतो त्यावेळी राजकीय विचार नव्हता, सामाजिक विचार होता. त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवावी, यासाठी मी त्यांना फोन करणार नाही. कारण आमचा तो स्वभाव नाही. विचाराचा झेंडा समाधीनंतरसुद्धा जिवंत राहतो, तो आम्ही कायम ठेवणार, असंही बच्चू कडू म्हणाले.