Girish Mahajan On Anil Deshmukh
Girish Mahajan Lokshahi

Girish Mahajan: गिरीश महाजनांचा अनिल देशमुखांवर निशाणा; म्हणाले; "तत्कालीन गृहमंत्र्यांनी माझ्यावर दबाव..."

भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Girish Mahajan Press Conference: अनिल देशमुख गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकी दिली होती. विजय पाटील आणि गिरीश महाजन प्रकरणात त्यांच्यावर धमकीचा आरोप होता,असा धक्कादायक अहवाल सीबीआयने पुणे मोक्का कोर्टात सादर केला. त्यानंतर अनिल देशमुख आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी देशमुखांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांच्यावर टीका करताना महाजन म्हणाले, इतके दिवस अनिल देशमुख झोपले होते का? त्यांना अचानक जाग का आली? सीबीआयने त्या प्रकरणात संपूर्ण चौकशी करून त्यांच्याकडे उंगली निर्देश केला आहे. तत्कालीन गृहमंत्र्यांनी माझ्यावर किती दबाव टाकला, याबाबत जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मुंडे यांनी सीबीआयला माहिती दिली होती.

गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करा, तीन वर्षांपूर्वी पुण्यात घडलेला गुन्हा हा ६०० किलोमीटर दूर रावेर तालुक्यातील निंभोरा येथे दाखल करण्यात आला. मला माहित आहे की, त्यावेळी अनिल देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांवर किती दडपण टाकलं. शेवटी मी त्यांना सांगितलं की, जाऊ दे तुम्हाला त्रास होईल आणि नाईलाजाने त्यांनी तो खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला. त्यामुळे हे सर्व सत्य आता सीबीआयच्या चौकशीत समोर आलेलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. पण अनिल देशमुख देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहे, असं म्हणत महाजनांनी देशमुखांवर हल्लाबोल केला.

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यावर बोलताना महाजन म्हणाले, विरोधकांचे कान बधीर झाले आहेत. त्यांचे डोळे खराब झाले आहेत.रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी महाराष्ट्राला भरीव निधी दिला आहे. पण कुठेतरी काहीतरी काढायचं आणि त्यावर बोलायचं हे विरोधकांचं काम आहे. महाराष्ट्राला काय मिळालं, हे विरोधकांनी डोळे उघडून बघायला पाहिजे, बजेट नीट वाचला पाहिजे. विरोधक झोपल्याचे सोंग करत आहेत. त्यामुळे त्यांना किती उठवलं तरी त्यांना जाग येणार नाही.

संजय राऊत हे कोणाबद्दलही काहीही बोलतात त्यांच्या तोंडाला झाकण नाही. ते मोदी आणि अमित शहा यांना देखील वाईट बोलतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला कोणीही महत्त्व देत नाही, असं म्हणत महाजनांनी राऊत यांच्यावरही टीका केली. तसच पुण्याच्या पूर स्थितीवर बोलताना महाजन म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतः पुण्याच्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व यंत्रणा एनडीआरएफ, एचडीआरएफ त्या ठिकाणी काम करत आहेत. नैसर्गिक आपत्ती आहे. विक्रमी पाऊस पुण्यात झालेला आहे.त्यामुळे निश्चितच काळजी करण्यासारखी पूर परिस्थिती पुण्यात आहे. परंतु, शासन मदतीच्या बाबतीत कुठेही कमी नाहीय. सर्व अधिकारी कर्मचारी कामाला लागले आहेत, असंही महाजन म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com