“तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा,” धनंजय महाडिकांनी दिला कर्नाटकच्या नागरिकांना इशारा
बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाही या वादाचे पडसाद उमटताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आल्याने राज्यातील नेते संताप व्यक्त करत असून प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाडिक म्हणाले की, “तुम्ही कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले करत आहात, पण तुम्हालाही देशभरात कुठेही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवावं. कोल्हापूर, सोलापूर कुठेही जायचं असेल तर त्यांच्या वाहनांना महाराष्ट्रातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे. असे हल्ले होत असतील तर महाराष्ट्र शांत बसणार नाही. यावर तोडगा निघाला पाहिजे असे महाडिक म्हणाले.
यासोबतच तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा असा इशारा धनंजय महाडिकांनी कर्नाटकच्या नागरिकांना इशारा दिला आहे. मी कोल्हापुरात स्थायिक असून माझ्यापासून १० किमी अंतरावर कर्नाटक हद्द सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. पण काल महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीचा मी जाहीर निषेध करतो. असे महाडिक म्हणाले.