काँग्रेसने मुर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हटले, संसदेत गदारोळ, सोनिया गांधी-स्मृती ईराणीत बाचाबाची
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांचा 'राष्ट्रपत्नी' म्हणून उल्लेख केल्याने चांगलाच वाद उफाळला आहे. या वक्तव्याचा भाजपने निषेध व्यक्त करत टीका केली आहे. काँग्रेसने (Congress) राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप भाजपने (BJP) केला असून जाहीर माफीची मागणी केली आहे.
कॉंग्रेसच्या आंदोलनादरम्यान कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपत्नी अशी टीप्पणी केली. यावरुन आता वाद निर्माण झाला असून लोकसभा आणि राज्यसभेतही त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभा, राज्यसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तर, राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली असून भाजप महिला खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या की, गरीब कुटुंबातील मुलगी देशाची राष्ट्रपती होणे हे काँग्रेस पक्षाला पचनी पडलेले दिसत नाही. कॉंग्रेसच्या हाय कमांडनेच संवैधानिक पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान करण्याची परवानगी दिली. कॉंग्रेस आदिवासीविरोधी, महिलाविरोधी, दलितविरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. याप्रकरणी अधीर रंजन चौधरी व सोनिया गांधींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, जाणून बुजून हे वक्तव्य करण्यात आले आहे. स्वत: एक महिला असूनही आपल्या नेत्याला अशाप्रकारे बोलण्याची परवानगी देणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुसरीकडे स्मृती इराणी यांनी संसदेत चर्चेदरम्यान अधीर रंजन चौधरी यांच्या विधानाचा संदर्भ देत सांगितले की, काँग्रेस आदिवासी, गरीब आणि महिला विरोधी आहे. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या आदिवासी आणि गरीब कुटुंबातील महिलेच्या प्रतिष्ठेचा अनादर करत आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने केले आहे.
सोनिया गांधी यांनी सभागृहात सांगितले की, अधीर रंजन यांनी माफी मागितली आहे. तसेच या प्रकरणात माझे नाव का घेतले जात आहे? त्यावेळी स्मृती ईराणी सोनिया गांधी यांना म्हणाल्या, "मैडम में आपकी मदद कर सकती हूं", त्यावेळी सोनिया गांधी यांनी त्यांना "डोंट टॉक टू मी," असे म्हटले. यावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जेव्हा सोनिया गांधी स्मृती ईराणी यांच्यांशी बोलत होत्या, तेव्हा त्यांनी धमकी दिली.