कोकणात रंगणार 'राऊत विरुद्ध राणे' महामुकाबला, उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. खुद्द नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना उमेदवारीबाबत माहिती दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केल्याचं राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यात जोरदार लढत होणार आहे. अशातच आता कोकणच्या राजकीय गडावर कोणता पक्ष विजयाचा झेंडा फडकवतो, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून विनायक राऊत यांनी प्रचार सभांचा धडाका लावत नारायण राणेंवर तोफ डागण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. परंतु, आता भाजपणे राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानं ठाकरे गट आणि भाजपत येणाऱ्या निवडणुकीत राजकीय घमासान होणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच नारायण राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केली आहे. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे. मला आनंदी आनंद झाला आहे. जिंकण्यासाठी आम्ही लढत आहेत आणि आम्ही जिंकणार.
किरण सामंत यांनी संमजसपणाची भूमिका घेत महायुतीत खोडा येऊ नये, तसच एकनाथ शिंदे यांनाही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी स्वत:हून शिंदे यांना विनंती केली. माझ्यामुळे काही तिढा निर्माण होत असेल, तर तुम्ही ही जागा भाजपला दिली, तर मला काही हरकत नाही. त्यामुळे उद्या नारायण राणे यांचा अर्ज भरायला उदय सामंत, किरण सामंत आणि दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलीय.