Porsche Accident : ससून रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या समितीला बिर्याणीची मेजवानी, चर्चांना उधाण
पुणे हिट अँड रन प्रकरणात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक झाली आहे. डॉ. श्रीहरी हरनोर आणि अजय तावरेंना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून डॉक्टरांना अटक करण्यात आली. ससून रुग्णालयात झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत सरकारने तीन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. जे. जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. या समितीने आज मेजवानीचा आस्वाद घेत चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी समितीने पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी केली. बिर्याणीच्या बॅगा ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये घेऊन जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
मंगळवारी या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. काही वेळ चौकशी केल्यानंतर समितीच्या खातीरदारीसाठी पुण्यातल्या प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याणी मागवण्यात आलेली होती. समितीमधल्या सदस्याांनी बिर्याणीवर ताव मारला. त्यामुळे समितीवर टीका होत आहे. समितीने तब्बल सात तास चौकशी केली आहे. सदस्यांसाठी स्पेशल बिर्याणीचं पार्सल आणल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
दरम्यान, पुण्यात एका श्रीमंत बापाच्या मुलाने त्याच्या पौर्शे कारने दोन जीवांना धडक दिली. या अपघातात दोन जीवांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पैशांच्या जोरावर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला भ्रष्ट करण्यात आलं. ससून रुग्णालयात आरोपीला मेडीकलला नेलं असता त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आली. अल्पवयीन आरोपी हा दारु प्यायलेला असताना त्याच्या रक्तात दारु आढळली नाही, असा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला. याप्रकणी पुणे पोलिसांनी तपास केला असता आरोपीच्या वडिलांनी 3 लाखांची लाच देवून तिथल्या डॉक्टरांना ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यास सांगितल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे.