ताज्या बातम्या
कोकण किनारपट्टी भागात 'बिपरजॉय'ने दिशा बदलली
रत्नागिरीसह कोकणातील अन्य जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी राहणार
निसार शेख, रत्नागिरी
कोकण किनारपट्टी भागात 'बिपरजॉय'ने दिशा बदलली असली तरी किनारी भागात त्याचा प्रभाव १५ जूनपर्यंत कायम राहणार असल्यामुळे कोकणातील जिल्ह्यात ताशी ४० ते ६० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल,असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील अन्य जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी राहणार असून सावधगिरीच्या सूचना प्रशासने केल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत म्हणजेच १ जूनपासून जिल्ह्यात १२.११ मि.मी. च्या सरासरीने एकूण १०९ मि.मी पावसाची नोंद झाली.
'बिपरजॉय'च्या प्रभावाने जिल्ह्यात किनारी भागात उद्दभवणाऱ्या संभाव्य उधाणाची खबरदारी घेताना किनाऱ्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अद्याप मोसमी पाऊस जिल्ह्यात सक्रीय झाला नसला तरी काही किनारी भागात पावसाबरोबरच वाऱ्याचाही जोर वाढला आहे.