तुर्कीच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप, सीरियाही हादरला; 2300 हून अधिक मृत्यू
तुर्की देशात आज भीषण भूकंप झाला आहे. तुर्कीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे. या भूकंपामुळे पूर्ण देश हादरून गेला आहे. 24 तासांत हा भूकंपाचा तिसरा धक्का त्याठिकाणी बसला आहे. संसाराचे संसार उधवस्त झाले आहेत. सोबतच मोठी जीवितहानी झाली आहे. या भूकंपात जवळपास 2300 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये व त्याच्या लगतच्या सीरियात या भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाला. मध्यपूर्वेतील तुर्किये (जुने नाव तुर्की), सीरिया, लेबनॉन व इस्रायल हे 4 देश आज सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे तुर्कियेत 2300 जणांचा मृत्यू, तर 5,385 जण जखमी झालेत. तुर्कीमध्ये 2 भूकंपाचे हादरे बसलेले असताना आता येथे 24 तासांत भूकंपाचा तिसरा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल आहे. याआधी 7.6 आणि 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते. मागील दोन भूकंपाच्या हादऱ्यामुळे शेकडो नारिकांचा मृत्यू झाला आहे. आणखी जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भूकंपामुळे तुर्कीमध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून भूंकपग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. अशातच भारतही तुर्कीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. बचावकार्यासाठी भारत सरकारने NDRF च्या दोन टीम तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शोहमोहीम आणि बचावकार्यासाठी भारत रिलीफ मटेरियलदेखील पाठवणार आहे.