Worli-Sewri: वरळी-शिवडी उन्नतमार्ग प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ
वरळी-शिवडी उन्नतमार्ग प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 1 हजार 7 कोटींची वाढ झाली आहे. वरळी-शिवडी उन्नतमार्गासाठी 2 हजार 283 कोटींचा खर्च होणार आहे. पुनर्वसनाचा तिढा सुटण्यास विलंब झाल्याने रखडलेल्या वरळी-शिवडी उन्नतमार्ग प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्पाचा खर्च तब्बल 1 हजार 7 कोटींनी वाढून 2283 कोटींवर गेला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत या वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पाचा खर्च याआधी 1276 कोटी निश्चित केला होता. प्रकल्पाच्या विलंबाबरोबरच संरचनेतही बदल केल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे. या मार्गाच्या प्रभादेवी येथील रेल्वे पुलाच्या आड 19 इमारती येत होत्या.
मात्र त्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा तिढा निर्माण झाल्याने प्रकल्प लांबला आहे. या पुलाचे काम अद्याप सुरू होऊ शकले नाही. त्यातून एमएमआरडीएने आता या पुलाच्या संरचनेत बदल केला आहे. त्यानुसार आता रेल्वे हद्दीतील पुलाचे काम पालिकेच्या नियमित रेषेनुसार केले जाणार आहे, तर पोहोच रस्त्यांचे काम सध्याच्या अस्तित्वातील रस्त्यांवरच केले जाणार आहे. या पुलाच्या दुसऱ्या स्तरावरून वरळी शिवडी उन्नत मार्ग जाईल. त्यामुळे लवकरच पुलाचे काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.