Marathi Language: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनी मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण असून मराठी भाषा आता सातासमुद्रापार जाऊन पोहोचणार आहे. गुरुवारी म्हणजेच आज 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हे मोठे आणि मराठी भाषेच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात यासाठी विशेष प्रयत्न करून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. अखेर जबरदस्त प्रयत्न आणि मोठ्या संघर्षानंतर मराठी भाषेस अभिजात दर्जा बहाल करण्यात आला आहे.