संभाजी ब्रिगेडसह, संभाजीराजे छत्रपतीच्या विरोधानंतर 'हर हर महादेव' बाबत झी स्टुडिओच्या मोठा निर्णय
राज्यात सध्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्याचे सत्र सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून हर हर महादेव हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आहे. हा वाद सुरु असताना झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार होता. या चित्रपट प्रदर्शनास संभाजी ब्रिगेडसह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र देखील संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिले होते. आता झी मराठीनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक मोठा निर्णय घेतला आहे.
चित्रपटातील सर्व वादग्रस्त प्रसंग वगळण्याचं ZEE स्टुडिओ आणि हर हर महादेव चित्रपटातील टीमने मान्य केलं आहे. याबाबतचं पत्रही संभाजी ब्रिगेडला झी कडून देण्यात आलं आहे. चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा निर्णय झी मराठीनं घेतला असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या कारणामुळे चित्रपटाला विरोध
या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय. अनेक इतिहास अभ्यासकांनी देखील या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. तर 'हर हर महादेव'च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार' असा इशारा बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी दिलाय. चित्रपटात अनेक व्यक्तींचं चारित्र्य हनन केल्याचाही वंशजांनी आरोप केलाय.