भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज? कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र; म्हणाले," विश्वासघातकी राजकारण..."
लोकसभा निवडणुकीचे बिगुल येत्या काही दिवसांतच वाजणार असून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे (शिवसेना) गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे, त्यामुळे जाधव ठाकरे गटात नाराज आहेत का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
भास्कर जाधव यांनी पत्रात काय म्हटलंय?
या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे...आपणा सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र...मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझआ वैयक्तीक स्वार्थ तरी काय? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळून येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास खाऊया. मी आपली वाट पाहतोय!!!
जाधव यांच पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. कदम म्हणाले, आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरुन तयार होते. तेव्हाच भास्कर जाधव यांना आम्ही विरोध केला. ही गोष्ट एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहित आहे. जाधव यांना आपल्या गटात सामील करून घेऊ नका, अशी भूमिका मी मांडली होती.