"...तेव्हा महाराष्ट्रातून एकच आवाज उठला"; शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भास्कर जाधव कडाडले
जो कुणी सत्तेच्या विरोधात जाईल, त्याच्यामागे शासकीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमीरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू, अशाप्रकारची धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं. त्यावेळी संपूर्ण देश शांत झाला होता. संपूर्ण देशातून कुणीही आवाज उठवत नव्हता. तेव्हा महाराष्ट्रातून एकच आवाज उठला, आता ४०० पार नाही, आता तुम्ही तडीपार...तो आवाज होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते शिवसेनेच्या (ठाकरे गट) 58 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.
जाधव पुढे म्हणाले, आपल्या पूर्वजांनी, मराठी माणसांनी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन केला. परंतु, मुंबई मिळवणारा मराठी माणूस महाराष्ट्रात कुठे आहे? अशाप्रकारची चर्चा सुरु झाली. अशाप्रकारचा शोध घेण्याचं काम सुरु झालं. त्यावेळी महाराष्ट्रातून एक डरकाळी फुटली आणि १९ जून १९६६ ला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला. आज त्या शिवसेनेला ५८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित जमलो आहोत. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभा निवडणुकीत दिल्लीश्वराला सत्तेचा माज चढला होता.
यावेळी ४०० पार, असं त्यांनी सांगितलं होतं. ४०० पारचा नारा देऊन संपूर्ण देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. ४०० खासदार आमचे निवडून येणार आहेत. ४०० खासदार निवडून येणार असल्यानं आमचीच सत्ता भविष्यात येणार आहे. जो कुणी सत्तेच्या विरोधात जाईल, त्याच्यामागे शासकीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमीरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू, अशाप्रकारची धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं.