राज ठाकरे म्हणजे परिवर्तनवादी भोंगा; सेनेच्या भास्कर जाधवांचा टोला
मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्दयावरून राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस सोबत जाऊन शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्दयापासून दूर गेली असल्याची टीका भाजपकडून करण्यात येतेय. तर शिवसेनेच्या (Shivsena) भुमिकेमुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न करत मनसेनं सध्या आपलं इंजिन हिंदुत्वाकडे वळवलं आहे. या सर्व घडामोडी सुरु असताना शिवसेनेचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांना परिवर्तनवादी भोंगा म्हटलं आहे. आधी झेंडा बदलला, गुजरात दौऱ्यानंतर मोदींच कौतूक केलं, काही काळानंतर पुन्हा मोदींवर टीका केली. पक्षाची धोरणं वेळोवेळी बदलली अशी बोचरी टीका भास्कर जाधवांनी केली आहे. एकढ्यावरच न थांबता पुढे ते म्हणाले की, त्यांच्या भोंग्याकडे कोणी लक्ष देण्याची गरज नाही. सध्या त्यांच्यासमोर पर्याय नाही म्हणून नाईलाजस्तव ते भाजपचा भोंगा वाजवत आहेत. काही काळानंतर ते पुन्हा भाजपवर टीका करतील आणि आपल्याला मदत करतील असा मिश्कील टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला.