'सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साईड बिझनेस' प्रवीण दरेकर यांचा आरोप
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सत्तेत राहून सट्टेबाजीचा मोठा खेळ खेळला. सत्तेत असताना सट्टा व्यवसायात सहभागी असणे हे छत्तीसगडमधील काँग्रेसचे वास्तव आहे. काल भूपेश बघेल यांच्या विरोधात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सट्टेबाजी ॲपचे प्रवर्तक छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना नियमित पैसे देत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. आतापर्यंत एकूण ५०८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. हे ईडीच्या तपासातून पुढे आलं आहे. असा दावा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषद बोलताना दरेकर म्हणाले की, 2 नोव्हेंबर 2023 रोजी ED ला गुप्त माहिती मिळाली की 7 आणि 17 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात रोकड छत्तीसगडमध्ये हलवली जात आहे. ईडीने हॉटेल ट्रायटन आणि अन्य ठिकाणी झडती घेतली. भिलाई आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक खर्चासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वितरित करण्यासाठी खास UAE मधून पाठवलेला कॅश कुरिअर असीम दास याला ताब्यात घेण्यात आले.
ईडीने असीम दास यांच्या कार आणि त्यांच्या निवासस्थानातून ५.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. असीम दास यांनी कबूल केले आहे की, जप्त केलेला निधी महादेव ॲप प्रवर्तकांनी छत्तीसगड राज्यातील आगामी निवडणुकीच्या खर्चासाठी नेते 'बघेल' याला देण्याची व्यवस्था केली होती.
ईडीने महादेव ॲपची काही बेनामी बँक खाती देखील शोधली आहेत. ज्यात 15.59 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम गोठवण्यात आली आहे. ईडीने असीम दासला अटक केली आहे.
या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक परदेशात बसून त्यांचे मित्र आणि सहकारी यांच्या मदतीने भारतभर हजारो पॅनल चालवत आहेत, विशेषत: छत्तीसगडमधील आणि त्यांनी त्यातून हजारो कोटी रुपये कमावले आहेत.
ईडीने यापूर्वीच 4 आरोपींना अटक केली आहे आणि 450 कोटींहून अधिक रुपयांची गुन्हेगारी रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेस पक्षाला काही प्रश्न विचारले आहेत आणि त्याच्या उत्तराची अपेक्षा आहे-
भाजपचे काँग्रेसला सवाल
● असीम दास शुभम सोनीच्या माध्यमातून छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांना पैसे पाठवत असे, हे खरे आहे का?
● असीम दास यांना व्हॉईस मेसेजद्वारे रायपूरला जाऊन भूपेश बघेलला निवडणूक खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले होते, हे खरे आहे का?
● 2 नोव्हेंबर रोजी हॉटेल टायटनमध्ये असीम दास यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले, हे खरे आहे का?
● PMLA अंतर्गत वेगवेगळ्या बँक खात्यांमधील 15 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत, हे खरे आहे का?
● असीम दास नावाच्या व्यक्तीकडून 5.30 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे, हे खरे आहे का?
असे थेट सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत विचारले आहेत.