Abhijit Bangar: श्रीगणेश आगमनापूर्वी मुंबई महानगरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत; अभिजीत बांगर यांचे निर्देश

Abhijit Bangar: श्रीगणेश आगमनापूर्वी मुंबई महानगरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करावेत; अभिजीत बांगर यांचे निर्देश

श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी मुंबई महानगरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येला सामना करावा लागू नये.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

दिलीप राठोड | मुंबई: श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी मुंबई महानगरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येला सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर, विनाव्यत्यय होईल यादृष्टीने येत्या दहा दिवसांत युद्ध पातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. मुंबई महानगरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती केली जाईल, हे सुनिश्चित करावे. ‘मास्टिक’ पद्धतीने रस्ते दुरूस्ती करण्याचे परिणाम चांगले आढळत आहेत. त्यामुळे मास्टिक पद्धतीनेच रस्त्यांची दुरूस्ती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

श्रीगणेश आगमन आणि श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यापूर्वी रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजविण्याणची कार्यवाही युद्धपातळीवर करावी, दुरुस्तीयोग्य रस्त्याची (Bad Patches) डागडुजी करावी, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक 22 ऑगस्ट 2024) महानगरपालिका मुख्यालयात रस्ते विभागातील अभियंत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. गिरीश निकम यांच्यासह अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, येत्या 7 सप्टेंबर 2024 रोजी श्रीगणेशाचे आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणेशोत्सवदेखील मुंबई महानगरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवादरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये याची खबरदारी महानगरपालिका प्रशासनाकडून बाळगली जात आहे. महानगरपालिकेच्या रस्तेच आणि वाहतूक विभागामार्फत खड्डेमुक्त रस्त्यांसाठी एकूण 227 नागरी संस्था प्रभागांसाठी (बीट) प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 227 दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिक पद्धतीने तात्काळ बुजवत आहेत. आता दुय्यम अभियंत्यांच्या बरोबरीने सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उप प्रमुख अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर (फिल्ड) स्वत:हून सक्रियपणे (प्रोऍक्टिवली) रस्त्यांची पाहणी करावी. खड्डे झाले असतील किंवा खड्डे होण्याची शक्यता असेल अशा रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी. दहा दिवसांत खड्डे दुरुस्तीची कार्यवाही पूर्ण करायची असली तरी श्रीगणेश विसर्जनापर्यंत पुन्हा जोरदार पावसाची नोंद झाली तर रस्ते नादुरूस्त होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.

यंदा खड्डे दुरुस्तीसाठी मास्टिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे मास्टिक पद्धतीनेच रस्ते दुरूस्ती करावी. सर्व विभागातील मास्टिक कुकर हे सुस्थितीत तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करण्यात यावी. सर्व संबंधित कंत्राटदारांना सूचना करून मास्टिकचे उत्पादन व उपलब्धतता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष द्यावे. जर कमी कालावधीत अधिकचा पुरवठा आवश्यक असेल तर तो उपलब्ध होईल, अशा पद्धतीने यंत्रणा सक्षम करावी. खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी आपसात समन्वय व नियोजन राखावे, असे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. बांगर यांनी दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com