फडणवीसांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान
कर्नाटकमधील भाजपा सरकारचे प्रमुख, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याच्या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केलं आहे.
बसवराज बोम्मई ट्विट करुन म्हणाले की, महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे. असे त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच ते म्हणाले की, “कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या समाविष्ट केले पाहिजेत”. तसेच २००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोतअसं बोम्मई यांनी म्हटले आहे.
बोम्मई फडणवीसांवर म्हणाले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.