बाप्पाच्या आगमनाने काश्मीरमध्ये शांतता नांदेल; युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार

बाप्पाच्या आगमनाने काश्मीरमध्ये शांतता नांदेल; युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार

गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या बाप्पाच्या मुर्ती विधीवत पूजा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आल्या.
Published on

चंद्रशेखर भांगे | पुणे: काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी आणि सर्वधर्मीय एकोप्याने राहावेत, यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट‘चे उत्सवप्रमुख आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुढाकारातून पुण्यातील सात गणपती मंडळांच्या सहकार्याने यंदाही सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यासाठी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या बाप्पाच्या मुर्ती विधीवत पूजा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आल्या.

काश्मीरमधील लाल चौकात गतवर्षी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे. त्यापैकी साऊथ काश्मीर अनंतनाग येथील गणेश मंडळ येथे यंदा 5 दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. या तीन गणेश मंडळांना शनिवारी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून सुपूर्द करण्यात आल्या. पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची प्रतिकृती कश्मीरमधील लाल चौकातील ‘गणपतीयार ट्रस्ट’ला गणेशाची मूर्ती सुपूर्द केली. तर मानाचा तिसरा गणपती ‘गुरूजी तालीम गणेश मंडळा’ची प्रतिकृती कुपवाडा येथील गणेश मंडळाला सुपुर्द करण्यात आली. तसेच, मानाच्या चौथ्या ‘तुळशीबाग गणेश मंडळा’ची प्रतिकृती साऊथ काश्मीर, अनंतनाग येथील गणेश मंडळाला सुपूर्द करण्यात आली. काश्मीर खोऱ्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोहित भान, संदीप रैना, संदीप कौल, नितीन रैना यांच्याकडे या मुर्ती प्रदान करण्यात आल्या.

यावेळी युवा उद्योजक आणि ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासह मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे विकास पवार, नितीन पंडीत, केसरीवाडा मंडळाचे अनिल सपकाळ तसेच पुण्यातील प्रसिध्द अखिल मंडई मंडळाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा थोरात उपस्थित होते.

यावेळी बोलताना ‘अखिल मंडई मंड़ळा’चे अण्णा थोरात म्हणाले, ‘‘आपला गणेशोत्सव जगात पोहोचला. मात्र, अशांत काश्मीरमध्ये हा गणेशोत्सव फक्त पुनीतजी बालन यांच्यामुळे पुन्हा सुरु होत आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन! काश्मीरमध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. ज्याप्रमाणे पुण्यातील गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी रोवली, त्याप्रमाणेच काश्मीरमधील गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ पुनीत बालन यांनी रोवली आहे.’’

कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे म्हणाले, ‘‘काश्मीर भारताचे नंदनवन आहे. यंदा पुन्हा पुनीतजींच्या माध्यमातून हा गणेशोत्सव साजरा होत आहे. याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पुण्यातील गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी काश्मीरपर्यंत पोहचवण्याचे मोठे काम केले आहे.’’ काश्मीर येथील गणपतीयार गणेश मंडळाचे मोहित भान म्हणाले, ‘‘गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि पुनीतजींचे सहकार्य म्हणून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतोय, याचा आम्हाला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे येथील सर्वधर्मिय लोक एकत्र येतील आणि या अशांत परिसरात शांतता नांदेल.’’

संदीप रैना म्हणाले, ‘‘काश्मीरमध्ये पहिल्यांदाच अनंतनाग येथे गणेशोत्सव साजरा करतोय, या उत्सवामध्ये आमच्या येथील महाविद्यालयीन तरुणीही सहभागी होणार आहेत. बहुतेक तरूण महाराष्ट्रातच शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या गणेशोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.’’

‘‘पुण्यातील प्रमुख सात गणपती मंडळाच्या सहकार्याने गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकातून गणेशोत्सवाला सुरूवात झाली. दहशतवादी कारवाईची कोणतीही भीती न बाळगता या मंडळाचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि शांततेसाठी असलेली ही चळवळ पुढे नेण्याची त्यांनी विनंती केली. त्यांनीच यंदा काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची विनंती केली होती. यामुळे पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव काश्मीरमध्ये साजरा होत आहे. त्याचा कश्मीर खोऱ्यात विस्तार होतोय, याचा मला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये शांतता नांदो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना.’’ असे पुनीत बालन म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com