बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी
बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
तळोजा जेलमध्ये पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याला बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. यामधील एक गोळी API निलेश मोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला लागली तर इतर दोन राऊंड मिसफायर झाले.
त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी पोलीस अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली.
याच पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 'बदला पुरा' 'महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार' अशा आशयाचे बॅनरवर लिहिण्यात आले आहे. यासोबत बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील आहे.