बांग्लादेशात सोशल मीडिया पोस्टवरुन वाद; हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर हल्ले
बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर हल्ल्याची घटना समोर आली आहे. फेसबुक पोस्टमुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी अनेक घरे जाळली आणि मंदिराची तोडफोड केली. ही घटना नरेल जिल्ह्यातील लहागरा गावातील आहे. येथे जमावाने मंदिरावर हल्ला केला आणि हिंदूंची घरे जाळली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केला त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हवेत गोळीबार करून परिस्थिती हाताळण्यात आली. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जमावानं हिंदूंची अनेक दुकानं, घरं आणि मंदिरांवर हल्ले केले आहेत. एका मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करून मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप संतप्त लोकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारच्या नमाजनंतर एका सोशल मीडिया पोस्टवरून हिंसाचार उसळला. आधी मुस्लिमांनी निदर्शनं केली आणि त्यानंतर हल्ले केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जमावानं सहापारा मंदिरात घुसून येथील फर्निचरची मोडतोड केली. आजूबाजूच्या दुकानांचीही तोडफोड करण्यात आली. पोलिस अधिकारी हरन चंद्र पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेत गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं एसपी प्रबीर कुमार रॉय यांनी सांगितलं. या घटनेची चौकशी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या हिंसाचारासाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.