Bandra Terminus: वांद्रे चेंगराचेंगरीनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; सोळा रेल्वे स्थानकांतील फलाट तिकीट बंद

Bandra Terminus: वांद्रे चेंगराचेंगरीनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; सोळा रेल्वे स्थानकांतील फलाट तिकीट बंद

वांद्रे चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने गर्दी विभागण्यासाठी पावले उचलली आहेत. मध्य रेल्वेने सात रेल्वे स्थानकांत आणि पश्चिम रेल्वेने नऊ रेल्वे स्थानकांत फलाट तिकीट विक्री बंद केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

वांद्रे चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने गर्दी विभागण्यासाठी पावले उचलली आहेत. मध्य रेल्वेने सात रेल्वे स्थानकांत आणि पश्चिम रेल्वेने नऊ रेल्वे स्थानकांत फलाट तिकीट विक्री बंद केली आहे. मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, दादर, बांद्रा टर्मिनस, बोरिवली, वसई, वलसाड, वापी, सुरत आणि उधना या स्थानकांतील फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आले आहेत.

छठ पूजा आणि दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २७ ऑक्टोंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी या निबंधांमधून सूट देण्यात आली असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

वांद्रे टर्मिनसमध्ये ३७० चौरस मीटरचा प्रतीक्षा कक्ष

वांद्रे टर्मिनसमधील फलाट क्रमांक १ वर रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेननंतर रेल्वे प्रशासनही खडबडून जागे झाले असून वांद्रे टर्मिनस येथे होणारी अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून वांद्रे टर्मिनसच्या परिसरात तब्बल ३७० चौरस मीटर एवढ्या जागेवर प्रतीक्षा कक्ष तयार करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी या कक्षात विविध सोयी सुविधा देण्यात आल्या असून एकाच वेळी जवळपास ५०० ते ६०० प्रवासी बसू शकतात.

यंदाच्या दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेतर्फे २०० विशेष गाड्या चालविल्या जात आहेत. मुंबईतून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत जाणाऱ्या नागरिकांसाठी २२ गाड्या चालविल्या जात आहेत. वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त गर्दीमुळे रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीत १० जण जखमी झाले. त्यामुळे, रेल्वे प्रशासनाने आता अतिरिक्त गर्दीला आळा मिळवण्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले आहेत. याअंतर्गत मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानकांवरील फलाट तिकीट विक्री ८ नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच, वांद्रे टर्मिनसवर प्रतीक्षा कक्षही तयार करण्यात आले आहे. या प्रतीक्षा कक्षात पंखे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आदींची सोय करण्यात आलेली आहे. या प्रतीक्षा कक्षामुळे फलाटावर होणारी प्रवाशांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, प्रवाशांना सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांबद्दल माहितीही दिली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com