एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; मुस्लिम बांधवांनी घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा मोठा उत्सव असतो. आषाढी एकादशी बकरी ईद हे महत्त्वाचा सण दि. २९ जून रोजी एकाच दिवशी येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी मोठा निर्णय घेतला आहे. एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव कोणतीही प्राणी हत्या करून कुर्बानी देणार नाही. असा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
वावी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी व बकरी ईद उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी वावी, पाथरे, पांगरी, नांदूर शिंगोटे, चास, दापूर येथील हिंदू-मुस्लिम समाजबांधव बैठकीत उपस्थित होते. यावेळी एकमेकांचे धार्मिक सण आणि उत्सव सलोख्याने साजरे करण्याची परंपरा वावी परिसरातील सर्व धर्मीय समाज बांधवांनी जपली. बैठकीत बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा ठराव सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष इलाहीबक्ष शेख यांनी मांडला त्यास डॉ. शकील कादरी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर वावीचे सरपंच विजय काटे यांनी मुस्लिम धर्मियांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले.