बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नक्षल कनेक्शन?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नक्षल कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा घटना स्थळावरुन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यपला अटक केली होती. शिवकुमार गौतम गोळीबार केल्यानंतर फरार झाला होता. अद्याप तो फरार आहे. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीप्रमाणं या प्रकरणातील तीन आरोपी पुण्याहून गोळीबाराची चौकशी करण्यासाठी झारखंडला गेल्याची माहिती समोर आली आहे. गौरव अपुणे, रुपेश मोहोळ आणि शुभम लोणकर पुण्याहून झारखंडला गेले होते. यामुळं लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवादी कनेक्शन समोर आलंय, असं दिसून येत आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी गौरव अपुणे, रुपेश मोहोळ आणि शुभम लोणकर गोळीबाराचा सराव करण्यासाठी पुण्याहून झारखंडच्या नक्षलग्रस्त भागात गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींनी AK-47 मधून गोळीबार केला आणि त्यानंतरच त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले असून पोलीस सखोल तपास करत आहेत. शुभम लोणकर हा अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.