Baba Siddique हत्याकांडाचं पुणे कनेक्शन उघड
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडाचे पुणे कनेक्शन समोर आलं आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात हा संपूर्ण कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली. त्याचा भाऊ शुभम पसार झाला असून, त्याच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ, रियान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. सिद्दिकी हत्या प्रकरणात पुण्यातून प्रवीण लोणकर, धर्मराज कश्यप, गुरुनील सिंग यांना अटक करण्यात आली.
प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात डेअरी चालवायचा. प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम समाजमाध्यमातून बिष्णोई टोळीतील सराइतांच्या संपर्कात होते. सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कातही प्रवीण आणि शुभम होते. बिष्णोई टोळीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुभमला अकोला पोलिसांनी अटक केली होती. कर्वेनगर भागातून बुधवारी ताब्यात घेण्यात आलेले चौघे जण शुभमच्या संपर्कात होते.
बिष्णोई टोळीने शहरातील एका सराफ पेढीच्या मालकाला जिवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच शंकरशेठ रस्त्यावरील एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकाविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.