तरुणीवर हल्ला! दर्शना पवारचे नाव घेत राज ठाकरेंचे ट्विट म्हणाले...
काही दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारचा मृतदेह आढळला. त्यातच काल (27जूनला) पुणे शहरातील सदाशिव पेठेत रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने तरुणी बचावली.
याच पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटले आहे की, काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.
दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.