राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर
राजस्थानच्या जनतेला दिलासा मिळणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा केली आहे. राजस्थान सरकार दारिद्र्यरेषेखालील आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'राज्य सरकार गरिबांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी सातत्याने लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. यासाठी राज्य सरकार गरिबांना स्वस्त दरात सिलेंडर देण्याची योजना आणणार आहे.' असे ट्विट करत त्यांनी म्हटले आहे. तसेच दारिद्ररेषेखालील नागरिकांना वर्षभरात 12 सिलेंडर मिळणार यासोबतच नागरिकांना 'रसोई किट'मध्ये स्वयंपाकघरातील सामानही देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा गेहलोत यांनी केली आहे.
ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येईल. राजस्थानच्या जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर करण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी सरकार नवीन योजना सुरु करणार आहे. या नव्या योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. या योजनेअंतर्गत वर्षाला 12 सिलेंडर दिले जातील. सरकारचं लक्ष्य गरीब आणि गरजू लोकांना योजनांमध्ये पूर्णपणे सामावून घेऊन त्यांना अधिक लाभ देणे हा आहे. असे अशोक गेहलोत म्हणाले.