"आमच्या आवाजाकडे दुर्लक्ष, मात्र PM मोदींनी पाश्चात्य देशांच्या मागणीनंतर केली कारवाई"
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जगभरात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आखाती देशांसह अन्य काही देशांनी सुद्धा भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल माफी मागण्याचं आवाहन भारताला केलं होतं. त्यानंतर शुक्रवारी राज्यात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम धर्मीयांकडून रस्त्यावर उतरून कारवाईची मागणी करण्यात आली. यावरुन उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली आहे. तर ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दुल मुस्लमिन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही आता आपली भुमिका मांडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांनी माफी मागण्याची मागणी केल्यावर घेतलेल्या भूमिकेवरून ओवैसी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही दोन तीन दिवसांपूर्वी ज्यावेळी भिवंडीत नुपूर शर्मांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याबद्दल वक्तव्य केलं होतं, तेव्हा मोदींनी ऐकलं नाही, मात्र आता जेव्हा पाश्चात्य देशांनी माफी मागण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी लगेचच कारवाई केली असं ओवैसी म्हणाले.
दरम्यान, एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा यांना फाशी देण्याची मागणी केली होती. त्यावर सुद्धा पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. नुपूर शर्मावर कायद्याने कारवाई व्हावी हीच पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.