Mumbai: मुंबईतील ‘या’ लोकल मार्गावर तब्बल ३८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान नवीन बांधकामासाठी हा ब्लॉक असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात अतिरिक्त लोकल सोडून मुंबईकरांची १० दिवस सेवा केल्यानंतर मध्य रेल्वेनं आता जम्बो मेगाब्लॉकचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल उपनगरीय यार्डच्या पुनर्निर्माण कामासाठी, पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन २ नवीन लाईनच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे.
हार्बरवरील मेगाब्लॉकच्या काळात हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. हार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्टेशनपर्यंत चालवल्या जातील. तर ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान सुरु राहिल.
दरम्यान हा मेगाब्लॉक सुरु होण्यापूर्वी सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी सुटणार आहे. ही लोकल ट्रेन रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. तर अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ही लोकल 11 वाजून 54 मिनिटांनी CSMT स्थानकात दाखल होईल. यानंतर लोकल सेवा बंद असणार आहे.
मेगाब्लॉकनंतर 2 ऑक्टोबर रोजी लोकलचं वेळापत्रक
मेगाब्लॉकनंतर सीएसएमटीहून पहिली लोकल 12 वाजून 08 मिनिटांनी रवाना होईल, जी 13.29 वाजता पनवेलला पोहोचेल.
तर पनवेलहून सीएसएमटीसाठी पहिली लोकल ट्रेन 13.37 मिनिटांनी रवाना होईल. ही ट्रेन 14.56 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
तर ठाण्याहून पनवेलला पहिली लोकल ट्रेन 13.24 मिनिटांनी रवाना होईल, जी 14.16 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.
याशिवाय पनवेलहून ठाण्याला पहिली लोकल ट्रेन 14.01 वाजता रवाना होईल आणि 14.54 वाजता ठाण्याला पोहोचेल.