Megablock: पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा मेगाब्लॉक; 'एवढे' लोकल रद्द होण्याची शक्यता

Megablock: पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा मेगाब्लॉक; 'एवढे' लोकल रद्द होण्याची शक्यता

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील 35 दिवस गोंधळ सहन करावा लागणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील 35 दिवस गोंधळ सहन करावा लागणार आहे. याचे कारण म्हणजे पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगोव आणि कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान 4.75 किमी लांबीच्या मार्गिकेचं काम केलं जाणार नाही. सध्या 27 आणि 28 ऑगस्टच्या रात्रीपासून हे काम सुरु करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सांताक्रूझ-गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरु असताना 2500 हून अधिक लोकल रद्द झाल्या होत्या. अधिका-यांनी यावेळी पाच विकेंड्सदरम्यान सुमारे 700 लोकल सेवा प्रभावित होतील असं सांगितलं आहे.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही रात्री 10 तासांचा मोठा मेगाब्लॉक घेण्याचं ठरवलं आहे. मुख्यतः शनिवारी हे ब्लॉक घेतले जातील जेव्हा दररोज 130-140 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. वीकडेजला मात्र कमी लोकल रद्द होतील. कारण त्या रात्री 5 तासांचा ब्लॉक असेल. सध्या प्रवाशांना ज्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, ती ही पायाभूत सुविधा सुधारित केल्यानंतर कमी होईल”.

रात्रीचा ब्लॉक रात्री 10-11 वाजता सुरु होणं अपेक्षित आहे. दिवस कोणता आहे यावरही ते अवलंबून असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, 7 ते 15 सप्टेंबर दरम्यान फक्त 7 सप्टेंबर वगळता रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत ब्लॉक घेणार नाहीत. योजनेनुसार, ही नवीन रेल्वे लाईन विरारकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी स्लो लाईनमध्ये रूपांतरित केली जाईल, सध्याची विरारकडे जाणारी स्लो लाईन नंतर चर्चगेटकडे जाणाऱ्या स्लो ट्रेनसाठी वापरली जाईल. चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्यांची सध्याची स्लो लाईन विरारकडे जाणाऱ्या जलद गाड्यांना दिली जाईल, विरारकडे जाणाऱ्या जलद मार्गाने वापरलेले ट्रॅक नंतर चर्चगेटला जाणाऱ्या जलद गाड्यांना पुरवतील, चर्चगेटला जाणारी फास्ट लाईन ही 5वी लाईन असेल आणि STA सहावी लाईन असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com