CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. शुक्रवारी कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात त्यांना जामिन मिळाला होता. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल हे तब्बल 177 दिवस तिहार तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भूईया यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना काही अटी शर्थींसह जामिन मंजूर केला होता. सशर्त जामिन मंजूर केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. जामिन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि यावेळी आपण येत्या दोन दिवसांत राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
"मी प्रामाणिक आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर मला मत द्या. आज मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही मला प्रामाणिक मानत की गुन्हेगार?" असा सवाल त्यांनी दिल्ली आणि देशातील जनतेला विचारात आपण दोन दिवसात राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे.
"देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही, खुर्ची सोडेन. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही, असे माझे मन सांगत आहे," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
"जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय द्याल तेव्हा मी त्या खुर्चीवर बसेन. त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की केजरीवाल चोर आहेत, भ्रष्ट आहेत, मी या कामासाठी आलो नाही. प्रभू श्रीराम 14 वर्षांनी वनवासातून परतले तेव्हा सीता मातेला अग्नीपरीक्षा सहन करावी लागली. आज मी तुरुंगातून परतलो आहे, मला अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात," अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घेण्याची केजरीवाल यांनी मागणी केली आहे.