Sidhu Moosewala वर सर्वात जास्त गोळ्या झाडणाऱ्या 18 वर्षीय अंकित सिर्साला अटक
दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल सध्या मुसावाला खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याचं काम करतेय. दिल्ली पोलिसांनी अंकित आणि सचिन नावाच्या दोन आरोपींना दिल्लीतील काश्मिरी येथून 3 जुलै रोजी रात्री 11 वाजता अटक केली आहे. दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबचे पोलीस दिल्लीत या शार्पशुटर्सचा शोध घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिपतचा रहिवासी असलेला अंकित हा या प्रकरणातील सर्वात तरुण आरोपी होता. याशिवाय अंकितचा मित्र सचिन भिवानी यालाही अटक करण्यात आली आहे. भिवानी हा आरोपींना आश्रय दिला होता आणि शूटर्सना मदत केली होती. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 2 शूटर्सला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींना सतत परदेशातून कॉल येत होते. घटनेच्या आदल्या रात्री 12 वाजता पहिला फोन करण्यात आला आणि त्यानंतर घटनेच्या काही वेळापूर्वी फोन करून मुसावालाचे गेट उघडून ते सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याची माहिती देण्यात आली. या नेमबाजांनी जवळपास 35 ठिकाणं बदलली आहेत. अनेक एजन्सी आपल्या मागे आहेत हे आरोपींना माहीत होते. त्यामुळे ते सतत त्यांची जागा बदलत होते. हे आरोपी लपण्यासाठी फतेहाबाद, पिलानी, बिलासपूर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कच्छ येथे पोहोचले होते आणि 24 तासांपेक्षा जास्त वेळ ते कुठेही थांबले नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित सिरसा याने सिद्धू मुसेवाला यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्याचवेळी त्याचा साथीदार सचिन विरमणी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. अंकित सिरसा थार गाडी चालवत असलेल्या गायकाच्या सर्वात जवळ गेला आणि दोन्ही हातांनी बंदूक पकडून त्यानं थेट गोळीबार केला.