Anil Parab
Anil Parab

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले; "शिवसैनिक रस्त्यावर..."

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा मोठ्या मताधिक्क्यानं विजय झाला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Anil Parab Press Conference : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा मोठ्या मताधिक्क्यानं विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला. निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर परब यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली. यावेळी परब म्हणाले, मला ४४ हजार ७९० च्या आसपास मतं मिळाली आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या इतिहासातील ही सर्वात जास्त मतं आहेत. मी प्रतिस्पर्ध्यांना २६ हजार २६ मतांनी मात केलेली आहे. हा देखील पदवीधर मतदारसंघातील आजवरचा उच्चांक आहे. पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा हा ट्रेंड गेले ३० वर्ष पाहायला मिळत आहे. परंतु, यावेळी झालेली निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले. ती लढाई माझी नव्हती. पण ती शिवसेनेच्या प्रत्येक शिवसेनेची आहे, असं समजून शिवसैनिक लढला आणि तो जिंकला.

ही लढाई माझ्या हातात नव्हती. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती. उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे यांच्या हातात ही लढाई होती. त्यांनी या लढाईत मला विजयी केलं, असं मला वाटतं. विरोधक म्हणतात मुस्लिम मतं मिळाल्याने तुमच्या पक्षाचा मोठा विजय झाला आहे, यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले, पदवीधर मतदारसंघाची यादी तपासून बघा आणि १ लाख २० हजारांमध्ये किती मुस्लिम आहेत, ते तपासा.

मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आम्ही जिंकलेलो आहोतच. फक्त अधिकृत निकाल जाहीर होणं बाकी आहे. नाशिकमध्ये चुरस आहे, नाशिकही आम्ही जिंकू, असा आमचा विश्वास आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे उमेदवार लढले आहेत. ते तिनही उमेदवार विजयी होतील आणि शिवसेनेचाच डंका पुन्हा एकदा वाजेल, ही मला खात्री आहे आणि हा माझा विश्वास आहे, असंही अनिल परब म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com