"अनिल परबांवरची कारवाई सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान"
मुंबई | सुमेध साळवे : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या दापोली रिसोर्टसह 7 विविध ठिकाणांवर ED तर्फे छापेमारी टाकले. तसेच अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. त्यानंतर आता मंत्री एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री एकनाथ शिंदे यावर बोलताना म्हणाले की, ईडीची कारवाई म्हणजे एक प्रकारचं दबावतंत्र असून हे लोकशाहीला घातक आहे. सुडापोटी कारवाई योग्य नाही, सत्ता येते जाते, यापूर्वी अनिल परब यांची चौकशी झाली आहे. बीएमसी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारवाई करणे उचित नाही. राजकारणासाठी अशी कारवाई ही लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. त्यांच्यावर झालेली कारवाई ही दुर्देवी असून, हे सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. मुंबई महापालिका अशा कारवाया करून जिंकून येणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर अशा कारवायांमुळे दबाव येणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.