अनिल देशमुखांची आज सुटका; आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर बाईक रॅली काढणार
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रहेसचे नेते अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात काल हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली.
1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली.