शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा
भूपेश बारंगे | वर्धा: स्थानिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हातील 3785 शेतकऱ्यांचे ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान 2 वर्षापासून रखडले असून त्याची एकूण रक्कम 567.75 लाख इतकी आहे. तर नवीन शेतकऱ्यांची लाभार्थी निवड प्रक्रिया सुद्धा थांबलेली आहे. तर दुसरीकडे शासनाकडून सिंचन विहीर करिता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून येणारे कुशल व अकुशल कामाचे पैसे सुध्दा प्रलंबित आहे.
एकीकडे सरकार विविध योजना राबविण्याचे सोंग करत आहेत, परंतु शेतकऱ्यांचे सरकारकडे फिरत असलेले पैसै देण्याचे नाव मात्र सरकार घेत नाही आहे. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती बघता ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांना निंदन मजुरी, रासायनिक खते, रासायनिक औषधी घेण्याचे पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल आपला "लाडका शेतकरी" असा जिव्हाळा असेल तर सरकारने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे थांबलेले विविध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा माणुसकी दाखवावी, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक कांग्रेस यांचे तर्फे मा. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कांग्रेस वर्धा जिल्हाच्या वतीने आयोजन
* शेतकरी लाडका वाटतं असेल तर आमच्या हक्काचे अनुदान तात्काळ जमा करा.
* ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचे थकीत असलेले 3785 शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ खात्यात वर्ग करा.
* सन 2024-25 या चालू वर्षांत मागणी धारक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी लाभार्थी निवड करावी.
* महात्मा गांधी रोहयो अंतर्गत कुशल व अकुशल पूर्ण झालेल्या कामांचे पैसे तात्काळ जमा करावे.