अमृतसरमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये मोठी चकमक; सिद्धू मुसेवालाच्या खुन्यांवर कारवाई?
Sidhu Moosewala Case : पंजाबच्या अमृतसरमधील चिचा भकना गावात पोलीस आणि गुंडांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणाशी संबंधीत गुंडांवर कारवाई सुरु असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. पंजाब पोलिसांना सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाशी संबंधित गुंड गावात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी गावाला घेराव घालून कारवाई सुरू केली. गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी गावाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. हे गाव पाकिस्तान सीमेजवळ अटारीजवळ आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर गुंड एके-47 ने पोलिसांवर गोळीबार करत असल्याची माहिती मिळत आहे.
एका गुंडाला कंठस्नान घातल्याची माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी संबंधीत असलेल्या एका गुंडाचा पंजाब पोलिसांनी चकमकीत खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगरूप रूपा आणि मन्नू हे मारेकरी कुसा गावात लपून बसले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. गोळीबाराच्या आवाजानं गाव हादरुन गेलं आहे. पोलीस आणि गुडांकडून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 100 राउंड फायर करण्यात आले आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. पोलिसांनी एका गुंडाचा खात्मा केल्याचं सांगण्यात येतंय. तर दुसरा अद्याप लपलेला आहे. पोलिसांनी गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. डझनभर वाहनांच्या ताफ्यासह पोलीस चकमकीच्या ठिकाणी पोहोचले असून, घटनास्थळी रुग्णवाहिका आणि बुलेटप्रूफ वाहनंही उपस्थित आहेत.