नव्या पिढीतील दोन्ही ठाकरे आज वरळीच्या महाराजाला जाणार; बाप्पा पावणार कोणाला?
शिवसेना (Shivsena) हा पक्ष मुळातच हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या पक्षाने नुकतीच आपली मराठीची भुमिका आणखी व्यापक करत आपली भुमिका मराठीच्या मुद्द्यावरून हिंदुत्त्वाच्या मुद्याकडे वळवली आहे. अश्यातच हिंदू सण म्हणजे हिंदुत्त्ववादी पक्षांसाठी व नेत्यांसाठी जनतेला थेट साद घालण्याची संधी मानली जाते. काही दिवसांपुर्वीच साजरा झालेल्या दहीहंडी उत्सवातही भाजप, शिवसेना, मनसे या तीनही पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले होतं. आता सुरू असलेल्या गणेशोत्सवातही सर्वच पक्षांकडून व पक्षाच्या नेत्यांकडून हिंदू जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आदित्य ठाकरे व अमित ठाकरे दोघेही आज वरळीच्या महाराजाच्या दर्शनाला:
मुंबईतील मानाच्या गणरायांपैकी एक असलेल्या वरळीच्या महाराजाच्या दरबारी अनेक राजकीय नेत्यांची वर्णी लागत असते. आज माजी मंत्री व शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे वरळीच्या महाराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत तर मनसे नेते व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील आज वरळीच्या महाराजा चरणी जाणार आहेत, हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाला आगामी महानगर पालिका निवडणूकीमध्ये यश मिळावं हेच साकडं लाडक्या गणरायाला घालतील.
दोन्ही नेत्यांचे राजकीय दौरे सुरू:
महाराष्ट्रामध्ये राजकीय भुकंप झाल्यानंतर शिवसेना पक्षातून अनेक आमदार, खासदार, नेते पक्षातून बाहेर पडले त्यामुळे पक्षाची अवस्था बिकट झाल्याचं दिसत असताना आदित्य ठाकरे हे पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी संपुर्ण राज्यभर निष्ठायात्रा करताना दिसत आहेत. तर, अमित ठाकरे देखील मनविसे पुनर्बांधणीसाठी राज्यभर दौरे करत अनेक महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यामुळे नव्या पिढीतील हे दोन्ही ठाकरे आता राजकारणात पुर्णत: सक्रीय झाल्याचं स्पष्ट होत आहे. आता या दोन्ही पक्षांसाठी सर्वात नजीकची निवडणूक म्हणजे मुंबई महानगर पालिकेची निवडणूक. या दोन्ही युवा नेत्यांनी आपापल्या पक्षांसाठी केलेल्या राजकीय दौऱ्यांचं फळ आगामी निवडणूकांमध्ये मिळू शकतं.